संग्रामपूर : बंद घराच्या सुरक्षिततेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे सुमारे ७१ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. चांगेफळ खुर्द येथे २० ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांगेफळ खुर्द येथील मूळ रहिवासी अॅड. शिवशंकर नारायण थेरोकार हे धारूर, जि. बीड येथील न्यायालयात सरकारी वकील म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांचे सावळा रस्त्यावरील घर बंद होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे सुमारे ७१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. २० ऑगस्ट रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच अॅड. थेरोकार यांनी धारूर येथून ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी तामगाव पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष येऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक २८४/२०२६ अन्वये कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुकावासीयांकडून होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करीत आहेत.