लाकडाच्या पैशांवरून वाद; चौघांकडून मारहाण, जिवे मारण्याची धमकी

मलकापूर : विकलेल्या लाकडाच्या व्यवहारातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात चौघांनी एका व्यक्तीला शिवीगाळ व लोटपाट करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी आसारीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फातिमा नगर, मलकापूर येथील मोहम्मद शाहरुख मो. अब्दुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते मोहम्मद अबुजर मो. अकरम याच्यासोबत विकलेल्या लाकडाच्या व्यवहाराबाबत बोलत होते. त्यावेळी मोहम्मद अरबाज मो. अकरम (२७), मोहम्मद अमान मो. अकरम (२१) आणि मोहम्मद वसीम मो. असलम (२१), तिघेही रा. चारखंबा चौक, मलकापूर, हे तेथे आले. लाकडी मालाच्या पैशांवरून आरोपींनी शाहरुख यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ व लोटपाट करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी आसारीने मारहाण करून, पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ६०७/२०२६ अन्वये कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!