खामगाव : बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथी लंपास केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी खामगाव बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत दोन्ही महिलांचे मिळून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. पिंप्री गवळी येथील बेबीबाई गजानन सुलोकार (५३) या बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची, सुमारे १० हजार रुपये किमतीची सोन्याची पोथी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्याचप्रमाणे नांद्री येथील छायाबाई दयालसिंग इंगळे (५०) यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची, सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोथीही चोरट्यांनी लांबविली. दोन्ही घटना गर्दीचा फायदा घेत घडल्याने बसस्थानक परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी कलम ३०३ (२) बीएनएसनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ सागर भगत करीत आहेत.