खामगाव : पालखी दर्शनासाठी कुटुंबीय घराबाहेर गेले असताना चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील १ लाख २० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बाळापूर फैल परिसरात १८ ऑगस्टच्या रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संशयाच्या आधारे शुभम बबन माटकर (२९, रा. बाळापूर फैल) याच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोशन जाधव (२६) यांनी बीसीमधून मिळालेले १ लाख २० हजार रुपये घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. त्यानंतर त्या पतीसह पालखीच्या दर्शनासाठी घराबाहेर गेल्या. दर्शन आटोपून दाम्पत्य घरी परतल्यानंतर कपाटाची पाहणी केली असता त्यातील रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी जाधव यांनी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. घरात प्रवेश करून कपाटातील रोकड चोरीला गेल्याचा संशय शुभम माटकर याच्यावर व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.