Headlines

वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरेच; २४ वर्षीय स्वप्निलचा उपचारादरम्यान मृत्यू

सिंदखेडराजा /वर्दडी बुद्रूक:- डोळ्यांत वैमानिक होण्याचे स्वप्न, त्यासाठी घेतलेले कठोर प्रशिक्षण आणि राज्यात मिळवलेले चौथे स्थान… आकाशात भरारी घेण्याची वेळ जवळ आली असतानाच एका भीषण रस्ता अपघाताने या स्वप्नाला ग्रहण लागले. अलिगड येथे प्रशिक्षणादरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या बुट्टा तांडा येथील २४ वर्षीय स्वप्निल उर्फ गोलू युवराज चव्हाण याचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री त्याने अखेरचा श्वास घेतल्याने सिंदखेड राजा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
स्वप्निलचे कुटुंब मूळचे बुट्टा तांडा येथील. त्याचे वडील युवराज चव्हाण हे नरेंद्र महाराज संस्थान, नानीज येथे अनेक वर्षांपासून कर्मचारी म्हणून कार्यरत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतानाच मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांची धडपड होती. लॉकडाऊननंतर कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले. स्वप्निलने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवगिरी महाविद्यालयात बी.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. शिक्षण घेत असतानाच स्वप्निलने महाज्योती समाजकल्याण संस्थेमार्फत वैमानिक प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेली परीक्षा दिली. या परीक्षेत त्याने राज्यात चौथा क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून त्याची उत्तर प्रदेशातील अलिगड येथे वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झाली. वैमानिक होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला आणि प्रशिक्षणही अंतिम टप्प्यात पोहोचले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. २३ जुलै रोजी मित्रांसोबत मोटारसायकलवरून अलिगड येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात स्वप्निलच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. उपचार सुरू असताना काही दिवस स्वप्निलची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे होते. मात्र, ११ ऑगस्ट रोजी रात्री त्याला अचानक दम लागत असल्याची तक्रार झाली. त्याने ही बाब नातेवाइकांना सांगितली. त्यानंतर मध्यरात्री उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, औषधांच्या सेवनानंतर झालेल्या संभाव्य दुष्परिणामामुळे स्वप्निलचा मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अधिकृतपणे स्पष्ट होणे बाकी आहे. स्वप्निलच्या वैमानिक प्रशिक्षणाबाबतही कुटुंबीयांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. महाज्योती समाजकल्याण संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर प्रशिक्षण दोन वर्षांत पूर्ण करण्याबाबत करार करण्यात आला होता. प्रशिक्षणासाठी लागणारा सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च संस्था करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रशिक्षण मध्येच सोडल्यास हा खर्च पालकांकडून दंडाच्या स्वरूपात वसूल करण्याची अटही करारात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी वाढत गेल्याने स्वप्निलचे वैमानिक होण्याचे स्वप्न अधिकच लांबले. दोन वर्षांत प्रशिक्षण पूर्ण झाले असते, तर कदाचित तो अलिगडमध्ये प्रशिक्षणासाठी नसता आणि हा अपघातही घडला नसता, अशी हळहळ कुटुंबीय व्यक्त करीत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत राज्यात वैमानिक प्रशिक्षणाच्या परीक्षेत चौथा क्रमांक मिळविणाऱ्या स्वप्निलच्या रूपाने एका होतकरू तरुणाचे आयुष्य आणि आकाशाला गवसणी घालण्याचे त्याचे स्वप्न दोन्ही अर्ध्यावरच थांबले. त्याच्या अकाली निधनाने बुट्टा तांडा परिसरासह सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!