Headlines

सासूवर लाकडी काठीने हल्ला; जावयाविरुद्ध गुन्हा, कौटुंबिक वादातून मद्यधुंद अवस्थेत सासूच्या घरी जाऊन शिवीगाळ; मलकापूरातील घटना

मलकापूर : पत्नी माहेरी राहत असल्याच्या कारणावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने टोक गाठले. मद्यधुंद अवस्थेत सासूच्या घरी पोहोचलेल्या जावयाने पत्नी व सासूला शिवीगाळ केली. सासूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याची घटना मलकापूर येथे घडली.

या प्रकरणी रजीयाबी सय्यदसलीम (वय ५०, रा. मुस्ताक अली नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी जावेद खान अफसर खान (वय ३४, रा. जळगाव जामोद) याच्याविरुद्ध ५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू असल्याने संबंधित महिला मागील दीड महिन्यापासून माहेरी राहत होती. २८ जुलै रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास आरोपी मद्यधुंद अवस्थेत सासूच्या घरी आला. त्याने पत्नी व सासूला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रजीयाबी यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२ व ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!