शेगाव : भरधाव ऑटोने कारला धडक देऊन सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्यानंतर कारचालकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शेगाव शहरातील अग्रसेन चौकात घडली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल प्रकाश अहीर (वय ४३, रा. पहुरजिरा, ता. खामगाव, सध्या रामानंद नगर, सुटाळा) यांनी याबाबत तक्रार दिली. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ते कारने अग्रसेन चौकातून जात असताना मोहम्मद रियाजुद्दीन फुरकान देशमुख (वय २५, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) याने एमएच-२८ टी-२०७८ क्रमांकाचा ऑटो भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या एमएच-२८ बीडब्ल्यू-९४९६ क्रमांकाच्या टाटा नेक्सॉन कारला धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील बंपरचे नुकसान होऊन सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. अपघातानंतर ऑटोचालकाने फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी मोहम्मद रियाजुद्दीन फुरकान देशमुख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, ३२४(४), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.