Headlines

दोन लाखांच्या बदल्यात आठ लाखांचे बनावट चलन! खामगाव-शेगावातील तिघांसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात; १२.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव : कमी पैशांत मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा संगमनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या दोन लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा प्रकार या कारवाईत उघड झाला. या प्रकरणात खामगाव व शेगाव येथील तिघांसह नाशिक येथील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संगमनेर शहर व परिसरात बनावट नोटांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत हे आरोपी दोन लाख रुपयांच्या बदल्यात आठ लाख रुपयांचे बनावट चलनी नोटांचे बंडल देत असल्याचे समोर आले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये खामगाव येथील मयुर किशोर सिद्धपुरा (वय ४८), उमेश कांबळे, शेगाव येथील गोलू उर्फ शंकर गिरी आणि नाशिक येथील संदिप धडमवार यांचा समावेश आहे. या आरोपींकडून ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असा उल्लेख असलेल्या बनावट नोटांचे बंडल जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम, १४ लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटांचे बंडल, एमएच ५६ ए ४४२३ क्रमांकाची टाटा नेक्सॉन कार, तीन मोबाईल फोन व अन्य साहित्य असा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी सागर बागडे यांच्या तक्रारीवरून चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!