शेगावात बालकामगारांविरोधात धडक कारवाई; एका बालकामगारासह दोन किशोरवयीनांची मुक्तता, दोन आस्थापनांवर गुन्हे

शेगाव :-बालकामगार प्रथा रोखण्यासाठी कामगार विभागाच्या कृतीदलाने शेगाव येथे धाड टाकून एका बालकामगारासह दोन किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी संबंधित दोन आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नियंत्रणाखाली कामगार विभागाच्या कृतीदलाने २८ जुलै रोजी शेगाव शहरातील दोन आस्थापनांवर संयुक्त धाडसत्र राबविले. तपासणीदरम्यान खामगाव रोडवरील इंडियन मोटर गॅरेज येथे एका बालकामगाराकडून काम करून घेत असल्याचे आढळले. तसेच महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट अँड वेल्डिंग वर्क्स येथे दोन किशोरवयीन कामगार काम करत असल्याचे निदर्शनास आले.
कृतीदलाने तातडीने तिन्ही मुलांची मुक्तता करून संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम १४ अन्वये दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे कामगार विभागाने स्पष्ट केले आहे. बालकामगार प्रथेचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच कोणत्याही आस्थापनात बालकामगार आढळल्यास त्याची माहिती कामगार विभाग, पोलीस किंवा संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे. ही कारवाई कामगार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुकाने निरीक्षक, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच शेगाव शहर पोलिसांच्या सहभागातून पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!