चिखली : शहरातील शाहूनगर परिसरात निर्माणाधीन इमारतीतील फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ४७ वर्षीय महिलेचा वरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मृत महिलेचे नाव वर्षा गुलाबराव चेके (वय ४७, रा. शाहूनगर, चिखली) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, शाहूनगर परिसरात एका खासगी विकासकाकडून निवासी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आपल्या बहिणीसाठी फ्लॅट खरेदी करण्याच्या उद्देशाने वर्षा चेके या एका महिलेसह संबंधित इमारतीत फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या.
पाहणी सुरू असतानाच त्या अचानक इमारतीवरून खाली पडल्याचे तेथील मजुरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, त्या कोणत्या मजल्यावरून पडल्या आणि दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत वर्षा चेके या शाहूनगर परिसरातील रहिवासी असून, त्यांचे पती गुलाबराव चेके हे लव्हाळा येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.