डोणगाव : शहरातील बंद घरे आणि व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी आता मुख्य चौकातील सराफा दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारात चोरीचा प्रयत्न फसला असला तरी सलग घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. माहितीनुसार, मुख्य चौकातील अमोल विष्णू घोडके यांच्या मालकीच्या ‘सूरज ज्वेलर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, प्राथमिक माहितीनुसार कोणताही ऐवज चोरता आला नसल्याने चोरट्याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विजय आजमिरे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल हर्ष सहगल, यशवंत चव्हाण आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात खंडोबा परिसरातील विठ्ठल शिंदे आणि विश्वास बोंडगे यांच्या बंद घरांमध्येही चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या प्रकरणांतील आरोपी अद्यापही फरार असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे बाजारपेठ व निवासी भागात रात्रीची पोलिस गस्त वाढवून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.