धुपेश्वर येथे देवदर्शन ठरले अखेरचे; पूर्णा नदीत बुडून ६० वर्षीय भाविकाचा मृत्यू

मलकापूर : देवदर्शनासाठी घरातून निघालेल्या एका ६० वर्षीय भाविकाचा धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे कुलमखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार बाबूलाल पोपट (वय ६०, रा. कुलमखेड, ता. मलकापूर) हे सोमवारी पहाटे धुपेश्वर येथे देवदर्शनासाठी जात असल्याचे घरच्यांना सांगून घरातून निघाले होते. सकाळच्या सुमारास धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी ठेवलेल्या शर्टाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डावरून मृताची प्राथमिक ओळख पटली. त्यानंतर मृताचे पुतणे संकेत अरुण ठक्कर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख सुशीलकुमार पोपट अशी निश्चित केली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!