मलकापूर : तालुक्यातील घिर्णी येथे घरात एकटी असलेल्या ३६ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या आरडाओरडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर संबंधिताच्या नातेवाईकांनी महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घिर्णी येथील ३६ वर्षीय महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जुलै रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ती घरी एकटी असताना आरोपी अमोल श्रीराम वाघमारे (वय ३२) हा तिच्या घरात घुसला. त्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता वाईट उद्देशाने महिलेचा हात पकडून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील लोक येत असल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेला. यानंतर नलुबाई श्रीराम वाघमारे (वय ६०) व भागवत श्रीराम वाघमारे (वय ३४), दोघेही रा. घिर्णी यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.