Headlines

मलकापूरात इतिहास जागा झाला ! छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य ऐतिहासिक प्रदर्शनी; शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा जिवंत अनुभव

मलकापूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर शहरात इतिहास अक्षरशः जिवंत झाला असून शिवकालीन शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देणारी भव्य ऐतिहासिक प्रदर्शनी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवशंभू पाईक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनीत शिवकालीन शस्त्रे, दुर्मीळ ऐतिहासिक दस्तावेज, आरमाराच्या प्रतिकृती, प्राचीन नाणी तसेच गड-किल्ल्यांचे भव्य मॉडेल्स पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ली. भो. चांडक विद्यालयातील डॉ. हेडगेवार सभागृहात १३ व १४ मे रोजी ही प्रदर्शनी सर्वांसाठी मोफत खुली ठेवण्यात आली आहे.

स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, त्यांच्या पराक्रमाची जाणीव युवकांमध्ये निर्माण व्हावी आणि शिवकालीन वैभवाचा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागा व्हावा, या उद्देशाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. चेतन जाधव यांनी दिली.
प्रदर्शनीमध्ये पुणे येथील इतिहास अभ्यासक संतोष चांदणे यांनी संग्रहित केलेली शिवकालीन तलवारी, भाले, ढाली, मोडी लिपीतील हस्तलिखित कागदपत्रे, राजमुद्रा, प्राचीन नाणी आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या अनेक दुर्मीळ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक वस्तू पाहताना उपस्थितांना जणू शिवकालीन इतिहासाच्या सुवर्णयुगात प्रवेश केल्याचा अनुभव येत आहे. यासोबतच जळगाव येथील महेश पवार यांनी साकारलेल्या गड-किल्ल्यांच्या आणि शिवरायांच्या आरमाराच्या देखण्या प्रतिकृती प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. विशेष म्हणजे युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा प्राप्त १२ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह त्या किल्ल्यांचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती देणारे फलकही मांडण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रदर्शनी केवळ पाहण्यापुरती मर्यादित न राहता इतिहासाचा अभ्यास घडवणारी ठरत आहे. इतिहासप्रेमींसाठी विविध ऐतिहासिक ग्रंथ आणि पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्रीही येथे करण्यात येत असून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच स्तरातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान आज १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांचा थरारक पोवाडा कार्यक्रम आणि प्रा. यशवंत गोसावी यांचे ‘शंभू चरित्र’ विषयावरील जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांद्वारे धर्मवीर संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, त्याग, संघर्ष आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान प्रभावीपणे उलगडले जाणार आहे. इतिहासाचा अभिमान आणि स्वराज्याचा जाज्वल्य वारसा अनुभवण्यासाठी नागरिक, युवक, विद्यार्थी तसेच माता-भगिनींनी मोठ्या संख्येने प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन शिवशंभू पाईक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!