खामगाव : कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील सुटाळा खुर्द परिसरात घडली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किशोर काशीराम चोपडे (वय ४९, रा. सुटाळपुरा, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पांडुरंग नारायण बोचरे, अजय पांडुरंग बोचरे, गोपाल पांडुरंग बोचरे (सर्व रा. सुटाळा खुर्द) तसेच दिपाली किशोर चोपडे (रा. सुटाळपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चोपडे यांनी घर विकून मिळालेली सुमारे ४४ लाख रुपयांची रक्कम सासरच्या मंडळींना दिली होती. त्याबदल्यात नवीन घर घेऊन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नंतर वाद वाढत गेल्याने चोपडे हे आई-वडिलांकडे राहत होते. पत्नीने सहजीवनास नकार देत घटस्फोटाची मागणी केल्याने वाद अधिक तीव्र झाला. दरम्यान, २ मे रोजी दुपारी चोपडे हे पत्नीला भेटण्यासाठी सुटाळा खुर्द येथे गेले असता आरोपींसोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी शिवीगाळ करत चोपडे यांना बेदम मारहाण केली व “जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर गोपाल बोचरे यांनी घरातून पेट्रोल आणून इतरांच्या मदतीने फिर्यादीवर ओतले आणि त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सुदैवाने स्थानिकांच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमी अवस्थेतील चोपडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. २५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९, ३५१ (३), ३५२ व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांबलकर करीत आहेत.