खामगाव : शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असतानाच चोरट्यांनी डोळ्यादेखत हातसफाई दाखवत ८२ वर्षीय वृद्धाच्या खिशातील सुमारे एक लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना ४ मे रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत भगवान देवराव डुबल (वय ८२, रा. शिवाजी नगर, जुना फैल, खामगाव) यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, डुबल हे आपल्या पत्नीसह मुलीकडे जाण्यासाठी अकोला–पुणे बसमध्ये चढण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास बसस्थानकावर आले होते. त्यावेळी परिसरात मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पायजामाच्या खिशातील पाकीट चलाखीने लंपास केले. या पाकिटात १३ ग्रॅम सोन्याची चैन (₹५२ हजार), ६ ग्रॅम बदाम अंगठी (₹२४ हजार), ४ ग्रॅम लाल खड्याची अंगठी (₹१६ हजार) तसेच २ ग्रॅमचा आलेम (₹८ हजार) असा एकूण २५ ग्रॅम सोन्याचा, अंदाजे १ लाख रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा क्रमांक २५३/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सागर भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.