रस्ता अरुंद, मध्येच पोल… नागरिकांचे हाल, प्रशासन मौन; मलकापूर बसस्थानकासमोरील हायमास्ट पोलमुळे वाहतुकीस अडथळा!

( उमेश ईटणारे )
मलकापूर :- शहरातील बुलढाणा रोडवर बसस्थानकासमोर उभारण्यात आलेला हायमास्ट लाईट पोल आता वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. आधीच अरुंद आणि शहरातील मुख्य मार्ग असलेल्या या रस्त्याच्या मधोमध पालिका प्रशासनाने बसवलेला हा पोल आता नागरिक आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी कोणतीही पूर्वतयारी किंवा वाहतुकीचा सखोल अभ्यास न करता हा हायमास्ट पोल उभारण्यात आल्याची टीका होत आहे. बसस्थानकातून बाहेर पडताना एसटी बस चालकांना या पोलमुळे मोठी कसरत करावी लागते. विशेषतः वळण घेताना बस अडखळते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.
या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा ॲम्बुलन्सही या कोंडीत अडकून पडत असल्याने गंभीर रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा हायमास्ट लाईट पोल तात्काळ हटवून योग्य ठिकाणी बसवण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!