मलकापूर :- शहरातील हनुमान नगर परिसरात जनावर चोरीच्या घटना पुन्हा समोर आल्या असून, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे एक आरोपी रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान नगर येथील सुपेश सुनील वानखेडे (वय २६) यांचा दीड वर्षांचा काळ्या-लाल रंगाचा जर्सी जातीचा गोरा (अंदाजे किंमत २० हजार रुपये) २७ एप्रिल रोजी हरवला होता. यापूर्वीही त्यांच्या दोन गायी व एक गोरा चोरीला गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, २८ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास परिसरातील युवक गस्त घालत असताना रघुनाथ नारायण बोरले उर्फ बाबू बोरले (रा. हनुमान नगर, मलकापूर) हा गोरा वाहनात भरताना दिसून आला. संशय आल्याने युवकांनी त्याला अडवून विचारणा केली. याबाबत माहिती मिळताच सुपेश वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान संबंधित गोरा पारपेठ येथे बांधून ठेवलेला असल्याचे समोर आले. तेथे जाऊन पाहणी केली असता तो गोरा स्वतःचाच असल्याची खात्री झाली. या प्रकरणी सुपेश वानखेडे यांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वेळी बजरंग दल शहर सहसंयोजक रितेश अशोकराव दहिभाते यांच्यासह सार्थक तांबडे, निलेश गवात्रे, रोशन तळेकर, अक्षय वराडे, दत्तात्रय दंडे, सचिन जावरे, कुणाल नारखेडे, श्रीकांत कुलकर्णी, मोहित सुलताने, श्रावण बोबटकर, विठ्ठल बोबटकर, रोशन कांडेलकर, शुभम नारखेडे, पवन जावरे, विशाल पवार, पवन लाड आदी उपस्थित होते. हनुमान नगर परिसरात मागील काही वर्षांपासून जनावर चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.