जुन्या वादातून थार अंगावर घालून पाच जणांना चिरडण्याचा प्रयत्न कोकलवाडीत भरदिवसा थरार; गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल

मलकापूर / नांदुरा:- शेतीच्या जुन्या वादाचे रूप मंगळवारी थेट जीवघेण्या हल्ल्यात बदलल्याची धक्कादायक घटना कोकलवाडी येथे घडली. महिंद्रा थार गाडी भरधाव वेगाने अंगावर घालून पाच जणांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रसिंह रामलालसिंह राजपुत (रा. वरखेड, ता. मलकापूर) यांची कोकलवाडी शिवारात गिट्टी खदान असून त्यांचा आरोपी रामेश्वर दादाराव भगत याच्यासोबत सन २०२० पासून शेतीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. या वादातून आरोपी सतत धमक्या देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी एका नातेवाईकांच्या तेरवी कार्यक्रमासाठी इंद्रसिंह राजपुत हे कोकलवाडी येथे गेले होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरासमोर ते काही नातेवाईकांसोबत उभे असताना आरोपी रामेश्वर भगत हा त्याच्या काळ्या रंगाच्या महिंद्रा थार (क्र. MH-56 A-8111) वाहनासह तेथे आला. त्यानंतर अचानक गाडी भरधाव वेगाने समोर उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. या धडकेत इंद्रसिंह राजपुत यांच्यासह अनिलसिंह राजपुत, रामसिंह राजपुत, आतीषसिंह राजपुत व प्रतापसिंह राजपुत हे जखमी झाले. काही जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बीएनएस कलम १०९ (१) सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!