मलकापूर :- शहरातील प्रशांत नगर परिसरातून एका व्यावसायिकाची बोलेरो पिकअप अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत नगर, बिर्ला रोड येथील रहिवासी भवरलाल पन्नाराम गोडरा (वय ३३) हे कॅटर्स व्यवसाय करतात. त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्र. एमएच-२८-बीबी-८४९५) खरेदी केली होती. नेहमीप्रमाणे त्यांनी ९ एप्रिल रोजी रात्री ही गाडी घरासमोर उभी केली होती. मात्र, १० एप्रिल रोजी सकाळी गाडी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेतल्यानंतरही गाडीचा कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, भरवस्तीतून घरासमोरूनच वाहन चोरीला गेल्याने शहरातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.