Headlines

मलकापूरात नकली नोटांचे रॅकेट उध्वस्त; ९ लाखांच्या बनावट नोटांसह चौघे जेरबंद, पोलिसांशी झटापटीत पीएसआय जखमी; एक आरोप फरार; ‘खाकी’तील 4 ते 5 जणांचा छुप्या पाठिंब्याची शहरात चर्चा

मलकापूर : मलकापूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या नकली नोटांच्या रॅकेटवर अखेर पोलिसांनी मोठा घाव घालत धाडसी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोमवारी (दि. ६ एप्रिल) दुपारी सुमारे तीन वाजता बसस्थानकाजवळील स्वराज बेकरी परिसरात सापळा रचून चार आरोपींना तब्बल ९ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह रंगेहात अटक केली. आरोपींनी पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांशी झटापट केली असून या झटापटीत पीएसआय अविनाश जायभाये यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणातील एक आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
मलकापूर आणि परिसरात नकली नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एलसीबीने अत्यंत काटेकोरपणे सापळा रचला. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याची माहिती समोर आली होती. इन्स्टाग्राम व फेसबुकवर बनावट नोटांचे बंडल दाखवून ‘एक लाख द्या, नऊ लाख घ्या’ अशा आमिषाने लोकांना फसवण्याची पद्धत या टोळीने अवलंबली होती. पोलिसांनी नकली ग्राहक बनून आरोपींशी इन्स्टावर संपर्क साधत सौदेबाजी केली आणि त्यानंतर आरोपींनी मलकापूर येथे येऊन माल देण्याचे ठरवले. ठरलेल्या योजनेनुसार बसस्थानकाजवळील स्वराज बेकरी परिसरात आरोपी येताच एलसीबी पथकाने त्यांना घेराव घालत पकडले. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या नोटांची १८ बंडले जप्त करण्यात आली. या बंडलमध्ये वरच्या बाजूला अस्सल नोट ठेवून आतमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा ठेवण्यात आल्याचे आढळून आले. दरम्यान, पकड टाळण्यासाठी आरोपींनी पोलिसांशी झटापट केली. त्यापैकी एका आरोपीने जवळील छोट्या चाकूने पीएसआय अविनाश अंबादास जायभाये यांच्यावर वार करण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळात सागर तायडे हा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी अमोल रमेश गोरे (वय २५, रा. रमाई नगर), भरत मधुकर वानखेडे (वय २५, रा. रमाई नगर), अविनाश सुनील तायडे (वय २२, रा. रमाई नगर) आणि चेतन गुलाबराव पाटील (वय २५, रा. महालखेडा, ता. मुक्ताईनगर) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी सागर तायडे याचाही या गुन्ह्यात समावेश असून सर्वांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीएसआय अविनाश अंबादास जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी करीत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण रॅकेटला मलकापूरातीलच काही पोलिसांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळेच शहरात बनावट नोटांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची नागरिकांमध्ये कुजबुज आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या खाकीवर काही मोजक्या लोकांच्या कृतीमुळे डाग लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘कुंपणच शेण खात आहे का?’ असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत असून या चर्चेतील ‘खाकी’मधील ते चेहरे कोण, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!