मलकापूर : महामार्गावरील मुंदडा पेट्रोल पंपाजवळील पुलावर उभारलेल्या विद्युत पोलवरील तार कटिंग करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या कारवाईत सुमारे २१ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रशांत परसराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ४ एप्रिल रोजी मुंदडा पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या पुलावर काही इसम विद्युत पोलवरील तार कटिंग करून चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेण्यात आली. दरम्यान, संशयितांनी आपल्या ताब्यातील दोन दुचाकी वाहने तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यावेळी एक इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांच्या हाती लागला. पकडलेल्या आरोपीचे नाव शेख नदीम शेख अकील (वय २५, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव खान्देश) असे असून त्याच्यासह इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून विद्युत पोलवरील तार कटिंगचे साहित्य अंदाजे २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २५१/२६ नोंद करण्यात आला असून बीएनएस कलम ३०३ (२), ६२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुनील राऊत करीत आहेत.
