आमदाराचे नाव सांगत दादागिरी; आई-बहिणीसह तरुणाला मारहाण तीन आरोपींवर अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

अंढेरा : राजकीय नेत्यांचे नाव सांगून सर्वसामान्यांवर दादागिरी करण्याचे प्रकार ग्रामीण भागात वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सुरा येथे एका तरुणाला त्याची आई व बहीण सोबत असताना मोटारसायकल आडवी लावून मारहाण केल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अंढेरा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंढेरा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरा येथील रहिवासी अक्षय रामचंद्र साळवे (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते त्यांच्या आई व बहिणीसह मोटारसायकलवरून फाट्याकडे जात असताना तीन आरोपी त्यांच्या जवळ आले व मोटारसायकल आडवी लावून त्यांचा रस्ता अडवला.
फिर्यादीने “गाडी का आडवी लावली?” असे विचारताच आरोपींनी “आम्ही आमदाराचे माणसं आहोत” असे सांगत दादागिरी सुरू केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीची कॉलर पकडून ढकलाढकली केली तसेच त्यांच्या आई व बहिणीलाही लोटपाट करत अश्लील शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी आरोपींनी “तुझ्याकडून काय होतं ते करून घे, उलट आम्हीच तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी उमेश भानुदास खाडे (रा. मेंडगाव), संतोष विनायक मुंडे व खंडू विश्वनाथ मुंडे (रा. नागणगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रुपेश शक्करगे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!