मलकापूर :कष्टाची किमया आणि जिद्दीची ताकद असेल तर कोणतेही स्वप्न दूर राहत नाही, याचे प्रेरणादायी उदाहरण मलकापूर येथील कु. रोशनी तिवारी हिने घालून दिले आहे. धान्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या मुलीने देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होत यशाचा मानाचा तुरा रोवला आहे. मलकापूरच्या जुन्या गाव परिसरातील रहिवासी विजय जगदीश तिवारी हे धान्य विक्रीचा व्यवसाय करून कुटुंब चालवतात. मर्यादित आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत कु. रोशनी तिवारी हिनेही चिकाटी, अथक परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर सीए परीक्षेत यश संपादन केले. देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रोशनीने दीर्घकाळ अहोरात्र अभ्यास केला. अनेक अडचणींचा सामना करत तिने आपल्या ध्येयाप्रती निष्ठा कायम ठेवली आणि अखेर या कठीण परीक्षेत यश मिळवत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. तिच्या या यशामुळे कुटुंबासह मलकापूर शहरातही अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कु. रोशनी तिवारी हिचा सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेकांनी तिच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आहे.