सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू; रुग्णवाहिकेवर नातेवाइकांचे गंभीर आरोप!

खामगाव :- पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामगावजवळील जनुना येथे सोमवारी (दि. 9 ) दुपारी घडली. मंगेश प्रकाश कांबळे (वय 32 ) असे मृतक सर्पमित्राचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात पकडलेला साप सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी मंगेश कांबळे हे जनुना तलाव परिसरात गेले होते. यावेळी सापाने अचानक त्यांना दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अकोल्याला नेत असताना मार्गातच रुग्णवाहिका चालकाने पैशांच्या कारणावरून टेंभुर्णा येथून रुग्णवाहिका परत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकारामुळे उपचारात विलंब झाल्यानेच कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील चौकशीची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!