दाताळा येथे डीपीवर काम करताना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू!

मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथे डीपीवर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने २५ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ७ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा गावातील पिंप्री गवळी फाट्यावरील डीपी बंद करून तिची दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी डीपीवर काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने शुभम रामकृष्ण वानखेडे (वय २४, रा. वाडी ता. नांदुरा, जि. बुलढाणा) याला जोरदार विद्युत शॉक लागला. त्यामुळे तो डीपीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने त्याला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ॲड. हरीश रावळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, पत्रकार विलास खर्चे, ॲड. दिलीप बगाडे तसेच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
उपजिल्हा रुग्णालयातील कक्षसेवकाने दिलेल्या मेमोवरून मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश महल्ले, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळू टाकरखेडे व पोलिस कॉन्स्टेबल सचिन दासर यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!