सिंदखेड राजा टी-पॉइंटवर अज्ञात वाहनाची धडक; युवकाचा मृत्यू!

देऊळगाव राजा :- शहरातील सिंदखेड राजा टी-पॉइंट येथे सोमवारी (दि. २३) पहाटे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाचे नाव प्रकाश सदाशिव कांबळे (रा. देऊळगाव राजा) असे आहे. याप्रकरणी सदाशिव काशीनाथ कांबळे (वय ७०, रा. त्र्यंबक नगर) यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश कांबळे हे जालना रोडवरील एका ढाब्यावर काम करत होते. काम आटोपून पहाटे घरी परतत असताना सिंदखेड राजा टी-पॉइंट येथे अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.

घटनेनंतर वाहनचालक फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या आधारे तपास सुरू केला आहे. गुन्ह्याची नोंद सहायक फौजदार गीते यांनी केली असून, पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत. या अपघातानंतर संबंधित टी-पॉइंटवरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!