शेगाव :- शहरातील माऊलीनगर भागात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंसह घरासमोर उभी असलेली कारही चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, वान प्रकल्पात लेखापाल म्हणून कार्यरत असलेले धीरजकुमार हे ७ फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी घरातील काही साहित्य लंपास केल्याचे निदर्शनास आले असून, विशेष म्हणजे घरासमोर उभी असलेली नवीन कारही चोरीला गेल्याचे आढळून आले. घरफोडीबरोबरच कार चोरी झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सदर प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
