( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )
बुलढाणा : प्लॉटवरून सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून दोघांनी एका युवकाला थेट घराच्या छतावरून खाली फेकून गंभीर जखमी केले. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी अमजद बागवान आणि शफीक बागवान यांच्याविरोधात २९ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत रमेश बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्लॉटच्या वादात मध्यस्थी करण्यावरून दोघांनी त्यांच्याशी वाद घातला आणि जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर २४ मार्च रोजी रात्री, घराच्या छतावर झोपलेले असताना, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने खाली फेकले. यात ते गंभीर जखमी झाले असून, सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी अमजद बागवान आणि शफीक बागवान यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.