खामगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील ढोरगाव येथे १३ जानेवारी रोजी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत पवन विलास टिकार (वय २५) या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पवन हा सायंकाळी घरासमोरील विहिरीवर गेला होता. दरम्यान, अचानक तोल गेल्याने तो थेट विहिरीत पडला. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेतली आणि तात्काळ मदतकार्य सुरू केले. दोरीच्या सहाय्याने त्याला विहिरीबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.या घटनेने गावात शोककळा पसरली असून टिकार कुटुंबियांसह संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त केली आहे.