खामगाव : गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एका वाहनासह ९ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना, नितीन मधुकर इंगळे (वय ३८, रा. शिरसगाव निळे, ता. शेगाव) याने एमएच-२८-एबी-७४५ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून शासनाने प्रतिबंधित व मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या गुटख्याची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ४ लाख ९६ हजार ४७६ रुपयांचा गुटखा व ५ लाख रुपयांचे वाहन असा एकूण ९ लाख ९६ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर भगत यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.