Headlines

अज्ञात वाहनाच्या कटमुळे दुचाकीस्वार ठार; धोंडव नाल्याजवळ भीषण अपघात; रस्त्यालगतच्या झाडाझुडपांमुळे अपघातांचा धोका वाढला

वरवट बकाल : एकलारा ते काटेल मार्गावर धोंडव नाल्याजवळ अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला कट मारल्याने झालेल्या भीषण अपघातात दानापूर येथील ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दानापूर येथील श्रीकृष्ण पुरुषोत्तम गाळकर (वय ४०) हे एमएच २८ एल २८९७ क्रमांकाच्या दुचाकीने वडगाव-दानापूरकडे जात होते. दरम्यान, एकलारा ते काटेल रस्त्यावरील धोंडव नाल्याजवळ दानापूरच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. अचानक कट लागल्याने गाळकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते डोक्यावर आदळल्याने गंभीर जखमी झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात पसरताच काटेल येथील युवकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानंतर श्रीकृष्ण गाळकर यांना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉ. समीउल्ला खान यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, एकलारा ते काटेल-कोलद-वडगाव-दानापूर मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडाझुडपे वाढल्याने वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी या मार्गावर अपघातांच्या घटना वाढत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने झाडाझुडपांची छाटणी करून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!