Headlines

“मलकापूरात गटार गच्च, प्रशासन गप्प! बुलढाणा रोडवर सांडपाण्याचा कहर; दुकानदारांचे आरोग्य धोक्यात”

मलकापूर ( दिपक इटणारे ) : शहरातील गजबजलेल्या बुलढाणा रोड परिसरात नाल्या गच्च भरल्या असून, सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. या सांडपाण्याला मार्गच नसल्याने ते थेट व्यावसायिकांच्या दुकानांसमोर जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नाल्यांमध्ये साचलेली घाण, प्लास्टिक कचरा आणि अडथळ्यांमुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार एका दिवसाचा नसून अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक व्यापारी व नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. “तक्रारी करूनही कोणी ऐकत नाही, अधिकारी पाहणीला येत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील काही भागात नाल्यांची स्वच्छता केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ही स्वच्छता केवळ कागदोपत्री किंवा दिखाव्यासाठीच झाल्याचे चित्र आहे. बुलढाणा रोडसह अनेक भागातील नाल्या आजही जैसे थे असून, घाणीने भरलेल्या अवस्थेतच आहेत.
दरम्यान, सांडपाणी दुकानांसमोर शिरत आहे. यामुळे ग्राहकही या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे दूर राहू लागले आहेत. त्यामुळे व्यापारावरही मोठा परिणाम होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या उपजीविकेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “आरोग्य विभागाला नागरिकांच्या जीवाशी काहीच देणं-घेणं उरलं नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
आता तरी नगरपालिका प्रशासन जागे होऊन तातडीने नाल्यांची सखोल स्वच्छता करणार का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाल होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!