चारित्र्यावर संशयातून वाद; तरुणाला घरात घुसून मारहाण, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : चारित्र्यावर संशय घेत झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीच्या घटनेत झाल्याने मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका तरुणाला घरात घुसून काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत चार जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख अकरम शेख साबीर (वय २४, रा. मिल्लत नगर, भालेगाव रोड, मलकापूर) हे १६ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भाजीपाला घेऊन घरी जात होते. यावेळी आरोपी मुस्तफा खान मुस्सा खान याने त्यांना थांबवून चारित्र्यावर संशय व्यक्त करत शिवीगाळ केली व चापटांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला आणि फिर्यादीला घरी पाठविले. मात्र काही वेळानंतर आरोपी मुस्तफा खान मुस्सा खान, लुकमान खान मुस्सा खान, शेख जावेद शेख इस्माईल आणि समीनबी शेख मुस्तफा शेख यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन पुन्हा वाद घालत काठी तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ४५६/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!