मलकापूर : दिवा तळाशी अंधार अशीच काहीशी अवस्था मलकापूर एसटी आगाराच्या कारभाराची झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवाशांना आपल्या गंतव्याची बस सहज ओळखता यावी, यासाठी आवश्यक असलेले अधिकृत मार्गफलक अनेक बसेसवर नसताना आता त्यावर आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही चालक आणि वाहक स्वतःच्या खिशातून चुना खरेदी करून बसवर गावांची अथवा मार्गांची नावे लिहित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘घरचा आहेर’ देत चालक-वाहक आपली जबाबदारी पार पाडत असताना आगार प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
मलकापूर आगारातून दररोज ग्रामीण तसेच विविध मार्गांवर एसटीच्या बसेस धावतात. या बसेस कोणत्या गावाकडे किंवा कोणत्या मार्गावर जात आहेत, हे प्रवाशांना सहज लक्षात यावे यासाठी बसच्या दर्शनी भागावर स्पष्ट आणि अधिकृत मार्गफलक असणे आवश्यक आहे. मात्र आगारातील अनेक बसेसवर संबंधित मार्गाचे अधिकृत फलकच नसल्याचे यापूर्वी समोर आले होते. काही बसेसवर तर अधिकृत फलकाऐवजी गावांची नावे चक्क हाताने लिहिलेली दिसून येत आहेत. आता या प्रकारामागील आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. प्रवाशांना बस ओळखता यावी आणि त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी चालक व वाहकांकडूनच चुना खरेदी करून बसवर मार्गाची नावे लिहिली जात असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच एसटीच्या व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून दिली जाणारी मूलभूत व्यवस्था कर्मचारी स्वतःच्या खिशातून उभी करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन चालक-वाहक पुढाकार घेत असतील, तर आगार प्रशासनाची भूमिका नेमकी काय, असा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. बस कोणत्या मार्गावर जाणार आहे, हे स्पष्टपणे दर्शविणे ही प्रवाशांसाठी कोणतीही अतिरिक्त सुविधा नसून मूलभूत गरज आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपरिचित मार्गावरील प्रवाशांना बस ओळखताना अडचणी येऊ शकतात. बसस्थानकावर एकाच वेळी अनेक बसेस उभ्या असताना अधिकृत मार्गफलक नसल्याने प्रवाशांना चालक किंवा वाहकाकडे चौकशी करावी लागते. अशा परिस्थितीत चालक-वाहकांनी स्वतःच्या खर्चातून तात्पुरती व्यवस्था करणे म्हणजे प्रशासनाच्या कामातील त्रुटी झाकण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आगार प्रमुखांच्या देखरेखीखाली बसेसची तपासणी, मार्गाचे नियोजन आणि बससेवेची व्यवस्था केली जाते. मग मार्गफलक नसलेल्या बसेस मार्गावर कशा धावतात? फलक उपलब्ध नसल्याची माहिती आगार प्रशासनाला नाही का? चालक-वाहकांना स्वतःच्या खिशातून चुना आणण्याची वेळ का येते? अधिकृत फलक उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे का? आणि मागणी केली असेल तर त्यावर आतापर्यंत काय कार्यवाही झाली, याचे उत्तर आगार प्रशासनाने देणे आवश्यक आहे. एकीकडे प्रवाशांकडून एसटीच्या सेवेचे पूर्ण तिकीट आकारले जाते, तर दुसरीकडे प्रवाशांना आपली बस ओळखण्यासाठीच कसरत करावी लागत आहे. त्यातही ही गैरसोय दूर करण्यासाठी चालक-वाहक स्वतःच्या खिशाला झळ सोसत असतील, तर हा प्रकार निश्चितच मलकापूर आगाराच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आगीत तेल ओतण्याचे काम होण्याआधी आगार प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. मलकापूर आगारातील सर्व बसेसची प्रत्यक्ष पाहणी करून कोणत्या बसेसना मार्गफलक नाहीत, याची माहिती घेण्यात यावी. अधिकृत फलक उपलब्ध करून देण्याबरोबरच चालक-वाहकांना स्वतःच्या खिशातून अशा वस्तू खरेदी करण्याची वेळ येणार नाही, याचीही व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचारी आपल्या परीने उपाययोजना करत असताना आगार प्रमुख मात्र या प्रकाराकडे गांभीर्याने पाहणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. चालक-वाहक प्रवाशांसाठी धावपळ करत असताना आगार प्रमुखांची जबाबदारी नेमकी कुठे संपते? असा थेट प्रश्न आता मलकापूरकरांकडून विचारला जात आहे.