खामगाव : किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना खामगावातील युनिव्हर्सिटी बायपास पॉइंट परिसरात घडली. दोन्ही गटांतील वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून, शिवाजीनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घराच्या बाजूला झालेल्या किरकोळ कारणावरून काही जणांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. दरम्यान, काही नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, त्यानंतरही मोहम्मद राजीक शेख फिरोज (वय ३५), फिरोज खान (वय ६०), शोहेब खान (वय ३०) आणि शाहरुख खान फिरोज खान (वय २५) यांनी पुन्हा वाद घालत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाकडून शोहेब खान फिरोज खान (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीत शेख आरिफ शेख युसुफ (वय ४२), मोहसीन शेख युसुफ (वय ३२), शेख काशीद शेख शकील (वय ३२) आणि शेख सिद्दिक शेख युसुफ (वय ४०) यांनी वाद घालून फिर्यादीच्या भावाला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच फिर्यादीच्या खांद्यावर व हातावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.