मलकापूर : शेती अवजारांच्या विक्रीतून जमा झालेल्या पैशांचा हिशेब मागितल्याने संतापलेल्या माजी कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने दुकान मालकावर हल्ला केल्याची घटना दाताळा येथे घडली. दुकानातच शिवीगाळ करीत लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत ६० वर्षीय दुकान मालक जखमी झाले. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दाताळा येथील किशोर त्र्यंबक घनोकार (वय ६०) यांचे बुलढाणा रोडवर जय भवानी अॅग्रो एजन्सी नावाने कृषी अवजारे व मशीन विक्रीचे दुकान आहे. त्यांनी गणेश शेषराव मिरगे (रा. मलकापूर) याला दुकानात कामावर ठेवले होते. मात्र, सुमारे १५ दिवसांपूर्वी त्याचा हिशेब पूर्ण करून त्याला कामावर येण्यास मनाई केली होती. दरम्यान, मिरगे याने शेतकऱ्यांकडून वसूल केलेली विक्रीची रक्कम दुकानात जमा केली नसल्याने घनोकार यांनी त्याला संबंधित पैशांचा हिशेब देण्यास सांगितले होते. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घनोकार यांनी याच पैशांबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून गणेश मिरगे आणि संजय तुकाराम डब्बे (रा. टेंभी जहागीरपूर, ता. मोताळा) हे दोघे दुकानात आले. त्यांनी घनोकार यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संजय डब्बे याच्या चिथावणीवरून गणेश मिरगे याने लोखंडी पाईपने घनोकार यांच्या दोन्ही पायांवर, पाठीवर व मांडीवर वार करून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता दोघांनी घनोकार व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी किशोर घनोकार यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. २२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.