नांदुरा : गर्दीच्या ठिकाणी प्रवासासाठी बसची प्रतीक्षा करत असतानाही महिलांच्या दागिन्यांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. नांदुरा शहरातील अजित इंटरनॅशनल स्कूल ते बसस्थानक परिसरादरम्यान एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) घडली. सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या या मंगळसूत्र चोरीप्रकरणी नांदुरा पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा अनिल गोसावी (वय ५२, रा. महसूल कॉलनी, जळगाव जामोद) या नांदुरा येथील अजित इंटरनॅशनल स्कूल ते बसस्थानक परिसरात जळगाव जामोदला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होत्या. त्यानंतर दुपारी नांदुरा-जळगाव जामोद बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी गळ्याला हात लावून पाहिले असता मंगळसूत्र गळ्यात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मंगळसूत्र चोरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे प्रवासादरम्यान महिलांच्या दागिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नांदुरा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.