Headlines

एसटी बसचा मोठा अपघात टळला! चालता चालता अचानक तुटला बसचा पाटा; बस रस्त्याखाली उतरली, दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत, मलकापूर ते टेंभी मार्गावरील घटना

मोताळा : प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या एसटी बसचा अचानक पाटा तुटल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याखाली उतरल्याची थरारक घटना मलकापूर ते टेंभी मार्गावर रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. मात्र, ऐनवेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसवरील नियंत्रण मिळविणे शक्य झाले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर आगाराची एसटी बस क्रमांक MH 48 N 9575 ही रविवारी सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास टेंभी येथून मलकापूरकडे येत होती. दरम्यान, प्रवास सुरू असतानाच अचानक बसच्या उजव्या बाजूचा पाटा तुटला. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या खाली उतरली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. बसमध्ये चालक व वाहकासह एकूण सहा प्रवासी प्रवास करीत होते.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बसचालक मो. समीर यांनी अत्यंत समयसूचकता दाखवत बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसामुळे बस उलटण्यासह मोठी दुर्घटना घडण्याचा धोका टळला. या घटनेत दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून इतर प्रवासी सुरक्षित राहिले. बसवर वाहक म्हणून गजानन लवंगे कार्यरत होते.

चालक मो. समीर यांनी संकटाच्या क्षणी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. एसटी चालकाच्या या समयसूचकतेमुळे सहा प्रवाशांचा जीव सुरक्षित राहिल्याची चर्चा परिसरात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *