मलकापूर : दसरखेड येथील बँजो केमिकल कंपनीत काम करीत असताना केमिकलयुक्त वेस्टेज पाणी अंगावर व तोंडावर उडाल्याने गंभीर जखमी झालेल्या ३३ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ललित वाघ, रा. मलकापूर असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ललित वाघ हे दसरखेड येथील बँजो केमिकल कंपनीमध्ये काम करीत होते. दुपारच्या वेळेस ते कंपनीतील वेस्टेज वॉटरचा कॉक सुरू अथवा बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक केमिकलयुक्त पाणी त्यांच्या अंगावर तसेच तोंडावर उडाले. या पाण्यामुळे त्यांच्या शरीराला गंभीर इजा झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने मलकापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ‘विदर्भ लाईव्ह’शी बोलताना घटनेची माहिती दिली.