शेगाव : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी सुरू असतानाही परवानगीशिवाय कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. नागरिकांना त्रास होईल अशा मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ऋषीकेश संजय सावदेकर (वय २५, रा. तथागत नगर, वॉर्ड क्रमांक १, नांदुरा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शेगाव येथील इंदिरा नगर परिसरात वाहन क्रमांक एमएच ०४ एचडी ०१५५ मधून डीजे स्टेडिओ साऊंड बॉक्स लावून मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. यावेळी पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही आवाज कमी करण्यात आला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून पारंपरिक वाद्य वाजविण्याची परवानगी असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. मात्र, डीजे स्टेडिओ साऊंड बॉक्स वापरण्यासाठी आवश्यक स्वतंत्र पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले. त्यामुळे ध्वनीची निर्धारित मर्यादा ओलांडून नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने ध्वनी प्रदूषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर शेषराव साबे यांच्या लेखी फिर्यादीवरून शेगाव शहर पोलिसांनी कायमी अप क्रमांक ६१६/२०२६, कलम २२३ भा. न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ रवी इंगळे करीत आहेत.