बावनबीर : किरकोळ वादातून दोन गट आमनेसामने येत त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बावनबीर येथे घडली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी सोनाळा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. त्यावरून पोलिसांनी एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. पहिल्या प्रकरणात राजीकोद्दीन रियाजोद्दीन मिर्झा (४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इकबाल शेख नबु, शेख अफजल शेख बिस्मिल्ला, शेख बिस्मिल्ला शेख इब्राहिम, शेख सिराज शेख बिस्मिल्ला, नाहिद परवीन शेख इक्बाल आणि शकिलाबी शेख बिस्मिल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी जमाव करून फिर्यादीच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा रफिकोद्दीन याच्या हातावर लोखंडी गजाने मारल्याचा, तर पत्नी आणि बहिणीस मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, याच घटनेप्रकरणी शेख अफजल शेख बिस्मिल्ला यांनीही तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून राजीक राजोद्दीन मिर्झा, रफीक मिर्झा, सादिक राजोद्दीन मिर्झा, यासमीन, राजीक मिर्झा आणि शमा बी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गटांच्या तक्रारींवरून सोनाळा पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.