Headlines

एवोनिथ मेटालिक व उन्नती प्रकल्पांतर्गत नरवेल येथे आशा कार्यकर्त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन; आर्ट वर्कशॉपलाही उत्स्फूर्त सहभाग

नरवेल (मलकापूर) : एवोनिथ मेटालिक व MAMTA HIMC यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नती प्रकल्पांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नरवेल, मलकापूर येथे आशा कार्यकर्त्यांसाठी आरोग्यविषयक प्रशिक्षण तसेच आर्ट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आशा कार्यकर्त्यांचे आरोग्यविषयक ज्ञान अधिक सक्षम करणे, महिलांच्या लैंगिक व प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या ओळखणे, योग्य वेळी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात प्रभावी आरोग्य जनजागृती करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांना सक्षम करणे हा होता.

प्रशिक्षणाचे मार्गदर्शन डॉ. नेहा भारद्वाज यांनी केले. त्यांनी RTI (Reproductive Tract Infection), STI (Sexually Transmitted Infection), सर्व्हायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

RTI संदर्भात प्रजनन मार्गातील संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत आरोग्य केंद्रात तपासणी व उपचार करून घेण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. स्वच्छता, सुरक्षित लैंगिक व्यवहार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार न करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

STI बाबत काही संसर्गांमध्ये सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दिसून येत नसल्याने संशय असल्यास योग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. वेळेवर निदान व उपचार न झाल्यास महिलांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आशा कार्यकर्त्यांनी महिला व जोडप्यांना सुरक्षित लैंगिक व्यवहार, तपासणी, उपचार तसेच जोडीदाराच्या उपचाराचे महत्त्व समजावून सांगावे, असे आवाहन करण्यात आले.

सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी नियमित तपासणी, संभाव्य लक्षणांची ओळख आणि वेळेवर निदानाचे महत्त्व यावरही डॉ. नेहा भारद्वाज यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. स्तनामध्ये कोणताही नवीन अथवा असामान्य बदल जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे, आवश्यकतेनुसार क्लिनिकल ब्रेस्ट तपासणी व मॅमोग्राफी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्वतःच्या स्तनांची स्व-तपासणी कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही देण्यात आले.

आशा कार्यकर्त्यांच्या सर्जनशीलतेला आर्ट वर्कशॉपमधून चालना

आरोग्यविषयक प्रशिक्षणासोबतच आशा कार्यकर्त्यांसाठी आर्ट वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. निष्मा आर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या दैनंदिन कामातून काही काळ विरंगुळा मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा तसेच आरोग्यविषयक संदेश चित्रकला व विविध कलात्मक माध्यमांतून सोप्या आणि आकर्षक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता यावेत, हा होता.

विविध कलात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होताना आशा कार्यकर्त्यांना मन मोकळे करण्याची, सकारात्मक ऊर्जा मिळविण्याची संधी मिळाली. यामुळे परस्पर संवाद, सहभाग आणि टीम भावना वाढण्यासही मदत झाली.

कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास जे. डाखोरे, डॉ. गौरव एस. काटोने, CHO, आशा सुपरवायझर तसेच आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

एवोनिथ CSR टीमकडून प्रफुल्ल भोपळे सर व कुणाल भातखडे उपस्थित होते. तर उन्नती प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक श्रीमती लीना उप्पल, श्रीमती पिंकी निमजे व श्रीमती संगिता यांची उपस्थिती होती.

हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी उन्नती प्रकल्पाच्या Field Coordinator रश्मी होले, विश्वजीत भुजाडे व सुरेखा जंगले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सुरेखा जंगले यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक आणि आशा कार्यकर्त्यांचे आभार मानले.

एवोनिथ मेटालिक व उन्नती प्रकल्पाच्या या उपक्रमामुळे आशा कार्यकर्त्यांना RTI, STI, सर्व्हायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक विषयांबाबत अधिक माहिती मिळाली. ही माहिती ग्रामीण भागातील महिला व कुटुंबांपर्यंत पोहोचवून आरोग्य जनजागृती अधिक प्रभावी करण्यास या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!