मलकापूर : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक संस्कृती, शिस्त आणि भक्तिमय वातावरणाला प्रोत्साहन मिळावे, तसेच मिरवणुकीला आधुनिकतेच्या नावाखाली येणाऱ्या अनावश्यक स्वरूपाला आळा बसावा, यासाठी मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने यंदा ‘गणराया पुरस्कार’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मंडळांना या स्पर्धेत विशेष महत्त्व मिळणार आहे. या स्पर्धेसाठी तीन शिक्षकांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचे परीक्षण केले जाणार आहे. ही स्पर्धा एकूण १०० गुणांची असणार आहे. त्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गणेश मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धेच्या परीक्षणामध्ये पारंपरिक वाद्यांना विशेष गुण दिले जाणार आहेत. ढोल-ताशा, लेझीम तसेच पारंपरिक पद्धतीने सादर होणाऱ्या कलांना प्रोत्साहन देण्यावर भर राहणार आहे. मिरवणुकीत पारंपरिकतेला फाटा देणाऱ्या बाबी आढळल्यास संबंधित मंडळाच्या गुणांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक ही केवळ जल्लोषाची न राहता संस्कृती, शिस्त आणि परंपरेचे दर्शन घडविणारी ठरण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात येणार असून, प्रत्येक विजेत्या मंडळाला प्रशस्तिपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते होणार आहे. मलकापूर शहर पोलिसांच्या या उपक्रमामुळे गणेश मंडळांमध्येही उत्साह वाढला असून, आपल्या मिरवणुकीत पारंपरिक संस्कृती, शिस्त आणि सामाजिक संदेश जपण्यासाठी मंडळांकडून विशेष तयारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ‘कोणाचा डीजे मोठा?’ यापेक्षा ‘कोणाची परंपरा आणि संस्कृती अधिक सुंदर?’ याकडे लक्ष लागले आहे.