पुणे : ‘गावी जाऊन परत येतो’ असे सांगून घरातून निघालेला ३० वर्षीय वॉचमन अद्याप घरी परतला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. आकाश सुरेश धुरंदर असे बेपत्ता व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या पत्नीने लोहगाव पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे.
आकाश धुरंदर हे १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने पत्नी पूजा यांनी नातेवाईकांकडे तसेच खंडोबा माळ, संतनगर, धानोरी, विश्रांतवाडी, वाघोली, पुणे रेल्वे स्टेशन आदी परिसरात शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. अखेर १४ सप्टेंबर रोजी पत्नीने लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
बेपत्ता आकाश यांचे वय ३० वर्षे, उंची ५ फूट ६ इंच, रंग सावळा, बांधा मध्यम असून, ते घरातून निघताना नेव्ही ब्लू शर्ट, ब्लू जीन्स पँट व काळ्या रंगाचे शूज परिधान करून होते. त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास लोहगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.