Headlines

लावणा बसथांब्यावर अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश; कारसह १.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जानेफळ : पहाटेच्या सुमारास वाहनातून अवैध देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर जानेफळ पोलिसांनी कारवाई केली. लावणा येथील बसस्थानक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत देशी दारूच्या २०० बाटल्यांसह कार व मोबाईल असा तब्बल १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केल्याने अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईची चर्चा सुरू आहे.
पोलिसांना १३ सप्टेंबर रोजी लावणा बसथांबा परिसरातून देशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सकाळी ६.१५ ते ६.४० वाजेदरम्यान पंचांसमक्ष कारवाई केली. यावेळी पिंप्री माळी येथील एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दारूसाठ्याची तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान ९० मिलीच्या संत्रा टँगो प्रीमियम कंपनीच्या १२० बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी ४० रुपये किमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत ४ हजार ८०० रुपये आहे. याशिवाय ९० मिलीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या ८० बाटल्या मिळून आल्या. त्यांची किंमत ३ हजार २०० रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ८ हजार रुपये किमतीचा देशी दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच २० एजी ८३७२ क्रमांकाची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिची किंमत १ लाख १० हजार रुपये आहे. त्याचबरोबर १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा दारूसाठा, वाहन व मोबाईल मिळून एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटोळे यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला वाहनासह पोलीस ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्याला सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस अंमलदार लक्ष्मण पिटकर यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!