मलकापूर : शहर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांनी रात्रीची गस्त आणि पेट्रोलिंग अधिक प्रभावी केले आहे. याचदरम्यान संत ज्ञानेश्वर नगर परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या अंधारात लपून बसलेल्या चार इसमांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना संत ज्ञानेश्वर नगर येथे चार इसम संशयास्पदरीत्या लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चारही इसम अंधारात लपलेले आढळून आले. पंचांच्या समक्ष व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पहाटे सुमारे ४ वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित इसमांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संजय विकास तायडे (३०), अक्षय मनोहर निशानकर (२९), सचिन सुभाष तायडे (२५) आणि अजय संजय खिरडकर (२१), सर्व रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे इसम सूर्यास्त ते सूर्योदयाच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून कोणताही दखलपात्र अपराध करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ६५४/२०२६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मलकापूर शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात रात्रीच्या वेळी कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे आणि पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम वरदाडे तसेच पोलीस कर्मचारी दिपक सोनोन, नवल राठोड, प्रविण गवई, गणेश बरडे, आसिफ शेख, योगेश तायडे व संतोष कुमावत यांनी केली.