चिखला काकड : बिबी येथील शिक्षक कॉलनी परिसरात घरातील कुटुंबीय झोपलेले असतानाच अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घराच्या पाठीमागील चॅनल गेटचे कुलूप तोडून तसेच दरवाजाला छिद्र पाडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याची घटना शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुटुंबीय रात्री घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घराच्या पाठीमागील चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर दरवाजाला छिद्र पाडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी झालेल्या ऐवजामध्ये अंदाजे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची गहू माळ, किंमत सुमारे ६० हजार रुपये, तसेच अंदाजे १० ग्रॅम वजनाची सोन्याची एकदाणी, किंमत सुमारे ९ हजार रुपये, असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.