खामगाव : जुन्या वादाचा राग मनात धरून ६२ वर्षीय महिलेला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना सुटाळा बु. येथे १८ ऑगस्ट रोजी घडली. या मारहाणीत महिलेच्या हातापायांसह खांदा व पाठीवर दुखापत झाली असून, याप्रकरणी खामगाव पोलिसांनी भारत पुरुषोत्तम कुईटे याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंजना पांडुरंग निंबोळकार या आपल्या भावाच्या दुकानाकडे जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. मागील दिवशी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी भारत कुईटे याने हातातील लाकडी दांड्याने निंबोळकार यांच्या हातापायांवर, खांद्यावर तसेच पाठीवर मारहाण केली. तसेच इतर आरोपींनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खामगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) व ३ (५) अन्वये भारत पुरुषोत्तम कुईटे याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.