जिल्ह्याच्या मातीतील कर्तृत्वाचा मराठवाड्यात गौरव! डॉ. तुषार गोंधणे यांना ‘मराठवाडा गौरव – २०२६’ पुरस्काराने सन्मानित त्वचारोग रुग्णसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; विधान परिषद सभापती राम शिंदे व मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गौरव
जिल्ह्याच्या मातीतील कर्तृत्वाचा मराठवाड्यात गौरव! डॉ. तुषार गोंधणे यांना ‘मराठवाडा गौरव – २०२६’ पुरस्काराने सन्मानित त्वचारोग रुग्णसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; विधान परिषद सभापती राम शिंदे व मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गौरव
बुलढाणा : बुलढाण्याच्या मातीत रुजलेले कर्तृत्व जेव्हा मराठवाड्याच्या व्यासपीठावर सन्मानित होते, तेव्हा तो गौरव केवळ एका व्यक्तीचा राहत नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरतो. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्वचारोग उपचार क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणारे बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. तुषार गोंधणे यांना प्रतिष्ठेच्या ‘मराठवाडा गौरव – २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे आणि मंत्री मा. अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. गोंधणे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
बुलढाणा जिल्ह्याशी आपली नाळ कायम जपत डॉ. तुषार गोंधणे यांनी मराठवाड्यातही त्वचारोग रुग्णसेवेचा विस्तार केला आहे. शहरातील रुग्णांसोबतच ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांपर्यंत दर्जेदार उपचार पोहोचविण्याच्या ध्येयातून त्यांनी सातत्याने कार्य केले. त्यांच्या सेवाभावी दृष्टिकोनामुळे आणि रुग्णांप्रती असलेल्या विश्वासार्हतेमुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुग्णसेवेला व्यवसायापेक्षा सामाजिक बांधिलकी मानून काम करणाऱ्या डॉ. गोंधणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे ‘बुलढाण्याचा सुपुत्र, मराठवाड्याचा विश्वास’ ही ओळख आणखी अधोरेखित झाली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. गोंधणे म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांचा, हितचिंतकांचा तसेच माझ्या संपूर्ण प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचा आहे. सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.” डॉ. गोंधणे यांच्या या उल्लेखनीय सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.